जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नुर महम्मद तडवी.

सुखी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई करण्यात आली. मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सुमारे ११ वाजता ऊटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

महसूल प्रशासनाला सुखी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू/रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने ऊटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर सापळा रचून संशयित ट्रॅक्टरची तपासणी केली.

तपासणीदरम्यान MH 30 BL 1594 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहनचालक निशांत वसंत इंगळे याच्याकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवानगी अथवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही.

यानंतर महसूल विभागाने संबंधित वाहनावर गौण खनिज नियमांनुसार कायदेशीर कारवाई करत ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय परिसरात जमा केला आहे.

दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी ऊटखेडा कैलास चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी मुंजलवाडी कमलाकर हाटकर आणि ग्राम महसूल अधिकारी सहस्त्रलिंग अंकित भोगवाडे यांच्या पथकाने मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!