जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा; दुष्काळी नुकसानीसाठी केळी पिकाला विमा संरक्षण देण्याची मागणी
नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीबाबत महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.

बैठकीस मंत्री गिरीश महाजन, नरहरी झिरवळ, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सद्यस्थितीत भूजलाची कमतरता निर्माण झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुष्काळामुळे केळी पिकाचे नुकसान झाल्यास त्यासाठी पीकविमा संरक्षण मिळावे, अशी मागणी रक्षाताई खडसे यांनी बैठकीत केली. यापूर्वी विमा कंपन्यांनी केळी पिकाचा दुष्काळी विमा संरक्षणात समावेश करण्याबाबत दर्शविलेल्या सहमतीची आठवण करून देत त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

केळी पीकविम्याशी संबंधित यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांचाही बैठकीत पाठपुरावा करण्यात आला. जिओ-टॅगिंग आणि पीकविमा पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करणे, वर्षभर सुरू असलेल्या केळी लागवडीसाठी व्यापक विमा संरक्षण उपलब्ध करून देणे तसेच पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसानभरपाई मिळवून देणे, या मागण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य पीकविमा संरक्षण व नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी यावेळी मांडली.
