जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.

मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावातील स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी कनवाडे मॅडम यांना दि. २३ जून २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मेळसांगवे गावाचे पुनर्वसन होऊन सुमारे ५० ते ५५ वर्षे झाली असूनही स्मशानभूमीची अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. स्मशानभूमीच्या कंपाऊंडला गेट बसविण्यात आलेले नसल्याने तातडीने गेट बसवावे, तसेच गटाराचे काम करून त्यावर आरसीसी झाकणे (धापा) बसवावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच स्मशानभूमीच्या कंपाऊंडच्या आत खासगी स्वरूपात वीटभट्टी लावण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे स्मशानभूमीच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असल्याने संबंधितांना ग्रामपंचायतीमार्फत नोटीस देऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली.

स्मशानभूमीत पाण्याची वीज व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता दूर करून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाची दखल घेऊन समस्या मार्गी न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला.

यावेळी मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, लक्ष्मण किशन वाघ व बाळू भागवत भोई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!