माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे आवाहन

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नागरिकांना शासनाच्या कारभारातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि उपलब्ध माहितीच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महासंघाचे नंदुरबार जिल्हा मुख्य संपर्कप्रमुख राम ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास तसेच शासकीय यंत्रणेच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. त्यामुळे माहिती अधिकार दिन केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांत मार्गदर्शनपर कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी भूमिका महासंघाने निवेदनातून मांडली आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना अर्ज प्रक्रिया व उपलब्ध माहितीबाबत योग्य मार्गदर्शन, तसेच माहिती अधिकाराच्या वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माहिती अधिकाराचा उद्देश नागरिकांना शासनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आणि प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्यासाठी सक्षम करणे हा असल्याने संबंधित दिनाचे शासकीय पातळीवर गांभीर्याने आयोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुखांना याबाबत आवश्यक सूचना देऊन २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश प्रशासनाच्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली आहे. या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संपर्क प्रमुख सुरेश तांबोळी, शहराध्यक्ष पंकज सोनार, उपशहराध्यक्ष अक्षय कंदोई, उपशहराध्यक्ष आकाश जयस्वाल, शहर संघटक सागर ठाकरे, सदस्य मुस्तफा वोरा, सदस्य विवेक ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना स्पष्ट सूचना देऊन माहिती अधिकार दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!