जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली यांच्या वतीने श्री तुळजाभवानी गणेश मित्र मंडळाच्या ठिकाणी ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा आरोग्य तपासणी व उपचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या शिबिराला परिसरातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात गरोदर माता व बालकांची तपासणी, असंसर्गजन्य आजारांची तपासणी व उपचार, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.

कार्यक्रमावेळी डॉ. शैलेश पाटील, डॉ. वैभव देव, आरोग्य सेवक ठाकरे, बाविस्कर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री तुळजाभवानी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

दरम्यान, अनिल वाडीले, शेख भैय्या शेख करीम आणि किरण धायले यांनी शिबिराला भेट देऊन डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व विविध शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

