चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील.

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे खळबळजनक घटना; प्रकृती चिंताजनक असल्याने जळगावला हलविले

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे सीआरपीएफ जवानावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास घडली. राज दीपक धनगर (वय २३, रा. अकुलखेडा) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून दोन जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले राज धनगर हे सोमवारी रात्री अकुलखेडा बसस्थानक परिसरात गेले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राज धनगर गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने चोपडा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी जखमी जवानाची रुग्णालयात भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

या घटनेमुळे अकुलखेडा परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!