विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जळगाव / भडगाव :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथून एक अत्यंत क्रूर आणि विकृत हत्याकांड उघडकीस आले आहे. केवळ ८०० रुपयांच्या वादातून आत्ते भावाने आपल्याच मामे भावाची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
मयत आणि आरोपी कोण?
मयताचे नाव धर्मा जुगा पवार (वय ४०) तर अटक केलेल्या आरोपीचे नाव जुगा कांतिलाल पवार (वय ३०) असे आहे. दोघेही नात्याने आत्ते-मामे भाऊ आहेत.
नेमका प्रकार काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गावोगावी जाऊन डुप्लिकेट रुद्राक्ष विकण्याचे काम करत होते. काल मयत धर्मा पवार याने ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. याच ८०० रुपयांच्या हिशोबावरून वाद झाला.
काल सायंकाळी ७:३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोघेही नगरदेवळा स्टेशन जवळ दारू पिण्यासाठी बसले होते. दारूच्या नशेत पैशावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. राग अनावर झाल्याने आरोपी जुगा पवार याने जवळचा दगड उचलून मयत धर्मा याला ठेचून मारले आणि जागीच संपवले.
हत्या करूनही विकृती संपली नाही –
हत्येनंतर आरोपीची विकृती इथेच थांबली नाही. त्याने मयताचे सर्व दात दगडाने ठेचून काढले आणि ते स्वतःच्या बॅगेत भरून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू असताना जवळच्या शेतात कुत्रे जोरजोरात भुंकत असल्याचा आवाज पोलिसांना आला. पोलीस त्या आवाजाच्या दिशेने गेले असता, आरोपी हा शेतातच दारूच्या नशेत बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले.
बॅग उघडताच पोलीसही हादरले –
त्याच्या जवळील बॅगची झडती घेतली असता, आतमध्ये मयताचे तोडलेले रक्ताने माखलेले दात आणि खाण्यासाठी ठेवलेली २ जिवंत कबुतरे आढळून आली. हे दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
