जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पावसातील प्रदीर्घ खंड लक्षात घेऊन मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे अनेक भागांतील पिकांना आवश्यक त्या अवस्थेत पुरेसा पाऊस मिळालेला नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत व मजुरीसाठी मोठा खर्च केला असून पावसाअभावी हा खर्चही भरून निघणे कठीण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनत आहे. भविष्यात पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतपातळीवर सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, पिकांचे तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीकविमा नुकसानभरपाई मिळवून देणे, पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करणे, आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे तसेच तालुक्यातील परिस्थितीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे, यांचा समावेश आहे.
शेतकरी व पशुपालकांवरील संकट अधिक गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसे शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली. यावेळी गोकुळ रामदास कोळी, सुरेश त्रिंबक गवते आणि उत्तम नारायण धनगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
