नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; माजी पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
चिंचविहिरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने झालेल्या या निवड प्रक्रियेत अशोक (संदीप) यादवराव नालकर यांची अध्यक्षपदी, तर सोनाली भारत साळवे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात झालेल्या या पालक सभेला ग्रामस्थ व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनाचा उद्देश तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पालकांच्या सहमतीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत सदस्यांची निवड
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सोनाली प्रमोद तोरणे, रवींद्र बाळासाहेब नरोडे, मनीषा संजय नालकर, अर्चना सचिन साळवे, सतीश बर्डे, मेघा सचिन बर्डे, ममता शरद नरोडे, सचिन सोपान नालकर आणि राहुल शेलार यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
माजी कार्यकारिणीचा कृतज्ञतापूर्वक सत्कार
यावेळी माजी अध्यक्ष मारुती नालकर तसेच त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक नालकर, उपाध्यक्षा सोनाली साळवे व सर्व नूतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नूतन अध्यक्ष अशोक नालकर यांनी शाळेचा सर्वांगीण गुणवत्ता विकास, डिजिटल शिक्षण तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी समिती पालकांच्या सहकार्याने कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला.
निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली. नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल चिंचविहिरे परिसरातील ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
