विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत ८ जण किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी घरगुती गणपतीची मूर्ती रिक्षातून विसर्जनासाठी नेली जात असताना रस्त्यात ४ ते ५ जणांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. ‘इथून जाऊ नका’ असे सांगत त्यांनी रिक्षाला पुढे जाण्यास विरोध केला. यानंतर काही क्षण दगडफेकीचा प्रकार घडला. मात्र हा प्रकार काही सेकंदातच थांबला.
या दगडफेकीत ८ जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच संबंधित वाहनाचे मोठे नुकसान झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित घरगुती गणपतीचे विसर्जनही त्यानंतर शांततेत पूर्ण झाले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून आढावा
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे रावेर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी घटनेमागील नेमके कारण, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि परिस्थिती कशी निर्माण झाली याबाबत माहिती घेतली. या प्रकरणी १४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शहरात शांतता
घटनेनंतर रावेर शहरात सध्या शांततेचे वातावरण आहे. घटनास्थळी किंवा शहराच्या अन्य भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अपूर्ण माहिती पसरू शकते हे लक्षात घेऊन कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, खात्री नसलेली माहिती, व्हिडिओ किंवा संदेश पुढे पाठवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
