जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

फैजपूर: येथील जंजाळकर बंधू करत असलेल्या उत्कृष्ट सुतारकामाचा देश पातळीवर दुसऱ्यांदा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण फोल्डिंग मंदिराची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या राष्ट्रीय संस्थेने दखल घेतली आहे.

३ फूट बाय ३ फूट रुंद आणि ८ फूट उंच असलेल्या या मंदिराचे एकूण ४,००० भाग (पार्ट्स) वेगळे करता येतात आणि ते पुन्हा सहज जोडताही येतात. अत्यंत गुंतागुंतीची रचना असूनही, या मंदिरात कुठेही फेविकॉल, खिळा किंवा स्क्रूचा वापर करण्यात आलेला नाही, हे या कलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. असे असूनही हे मंदिर अतिशय मजबूतपणे उभे राहते. या अनोख्या कामगिरीची खातरजमा करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने याची नोंद घेतली आहे. जंजाळकर बंधूंना यापूर्वी २००२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘जिल्हा उद्योजकता प्रथम पुरस्कार’ मिळाला होता.

सावदा-फैजपूर येथील ‘दादासाहेब वसंतराव विष्णू पाटील सहकारी औद्योगिक वसाहती’त मागील ३२ वर्षांपासून ‘रामेश्वरम फोल्डिंग मंदिर इंडस्ट्री’ या नावाने लाकडी घडीचे देव्हारे बनवण्याचा उद्योग सुरू आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारचा हा एकमेव उद्योग असावा. या आगळ्यावेगळ्या उद्योगाची संकल्पना श्री. प्रभुदास माधव जंजाळकर यांची असून, तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू श्री. ईश्वरदास आणि श्री. किशोरदास अव्याहतपणे व प्रामाणिकपणे काम करत आहेत.

त्यांच्या कामातील शुद्धता, सचोटी आणि उत्कृष्ट दर्जामुळे (क्वालिटी) ग्राहक येथे मंदिर बनवण्यासाठी ४ ते ६ महिने वाट पाहण्यास (वेटिंग) तयार असतात. जंजाळकर बंधूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!