जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारकांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

बायोमेट्रिक जुळले नाही तर आधार OTPचा पर्याय

२१ सप्टेंबर २०२६ पासून ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात जुळत नाहीत, त्यांना आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या माध्यमातून एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिकमध्ये अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

हरवलेले कार्ड पुन्हा काढता येणार

हरवलेले किंवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधाही २१ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

QR कोड पावतीवर मिळणार सवलतीचे तिकीट

१६ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रवाशाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे.

दरम्यान, नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत एनसीएमसी कार्ड ॲक्टिव्ह करून त्यामध्ये टॉप-अप करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

एसटीच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल पद्धतीने सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!