२१ ते २३ सप्टेंबरदरम्यान १४ जिल्ह्यांना येलो अलर्ट; उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव : राज्यात परतीच्या पावसाची चाहूल लागली असून, कोकणासह घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथा परिसरासाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र जळगाव जिल्ह्याला सध्या कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
२१ ते २३ सप्टेंबरदरम्यान या भागांना येलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या १४ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची शक्यता
उद्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, हिंगोली, बीड, परभणी आणि अहिल्यानगर या भागांतही येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात पावसाअभावी पिकांना फटका बसला असून, आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष हवामानाकडे लागले आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
नाशिकमध्ये २१ सप्टेंबरनंतर पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तर २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये २१ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतर दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.
त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि अतिवृष्टीचा इशारा असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तर जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी पुढील काही दिवस हवामानातील बदलावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
