युवासेनेकडून महावितरणला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला नंदगाव-पिलखेडा परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गालबोट लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून, रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक गणेश देखावे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित होत असल्याने या कार्यक्रमांवर परिणाम होत असून, गणेश देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचाही हिरमोड होत आहे.

दरम्यान, ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या कारणामुळे वीजपुरवठा बंद होत असल्याचे सांगण्यात येत असून, नंदगाव येथील डीपीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठ्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रश्नाची युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी दखल घेत महावितरणकडे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नंदगाव-पिलखेडा परिसरातील डीपी व वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करून बिघाड दूर करावा. तसेच भविष्यात वारंवार वीजखंडित होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबवून नागरिकांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!