विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

मुक्ताईनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील परिसरात एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी निवृत्त बीएसएफ कर्मचारी रामराव केशव सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे घर ८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजल्यापासून ते १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून घरात शिरकाव केला आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लंपास केली.

चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या विविध अंगठ्या, एअर रिंग, मंगळसूत्राच्या वाट्या, कानातील दागिने, गंठण, चैन, लॉकेट तसेच चांदीची पायल, जोडवी आणि २० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २,५६,९५० रुपये असल्याचे पोलीस दप्तरी नोंदवले आहे.

घर बंद असल्याची संधी हेरून ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या संशयास्पद हालचाली आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनाज पाटील आणि पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त होत आहे.

या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि जयेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!