मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
धनसावंगी : धनसावंगी तालुक्यातील संत रामदास महाविद्यालयात अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदावर नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर चोराजी खरात यांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, एस.टी. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदावर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी शासनाच्या आरक्षण धोरणाचा भंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून नियुक्ती प्रक्रिया राबविल्याचा आरोपही करण्यात आला असून, माहिती अधिकारांतर्गत मागविलेली कागदपत्रे, निवड समितीचा इतिवृत्तांत, गुणपत्रक व निवड यादी उपलब्ध नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने संबंधित नियुक्तीची तातडीने चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच पात्र उमेदवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत महाविद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीअंती या आरोपांबाबत नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.
