जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

चोपडा : येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पियुष सचिन बारी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे तर्फे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत इंग्रजी विषयात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक (९७ गुण) मिळवत स्व. रामचंद्र यशवंत दळवी स्मृती पारितोषिक प्राप्त केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेतर्फे पियुष बारी यांचा गुणगौरव करण्यात आला.

भगिनी मंडळ संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, उद्योजक आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच पियुष बारी यांचे पालक उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पियुषला भेटवस्तू व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पियुषचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक मधुकर बारी यांचाही सत्कार करण्यात आला. पियुषला मार्गदर्शन करणाऱ्या इंग्रजी विषय शिक्षिका एस. आर. बारी व पी. एस. चव्हाण यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी गुणवंतांचे कौतुक करताना प्रा. अरुणभाई गुजराथी म्हणाले, “ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. एखाद्या सामान्य घरातील मुलाने जेव्हा उत्तुंग यश मिळवते तेव्हा तो आनंद फक्त त्याच्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो सर्वांच्या अभिमानाचा विषय बनतो. पियुषचे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे.” पियुष बारी यांनीही शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रहास गुजराथी, आशिष गुजराथी आणि पवन देसले यांनीही मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनिल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत चौधरी, संजय सोनवणे, भावेश लोहार, प्रशांत चव्हाण, वनराज महाले, विजय पाटील, सागर चौधरी, कविता पाटील, यशोदा ठोके यांच्यासह बाळासाहेब भालेराव, राधेश्याम पाटील आणि मधुकर साळवे यांनी परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!