विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पाचोरा (प्रतिनिधी) – गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल, पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता प्रशासनाने केलेल्या या अचानक छापेमारीत तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रशासनाने या कारवाईत १ जेसीबी, ८ डंपर, १६ ट्रॅक्टर आणि नदीच्या पाण्यातून वाळू काढण्यासाठी वापरली जाणारी २ विशेष ‘किनी’ वाहने ताब्यात घेतली आहेत. यासोबतच घटनास्थळावर असलेल्या सुमारे ८० ब्रास अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आला आहे. जप्त केलेली सर्व वाहने पंचनामा करून सुरक्षिततेसाठी पाचोरा एम.आय.डी.सी. येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील कुरंगी, परधाडे, दुसखेडा, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा आणि दहिगाव (संत) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू होते. या बेकायदेशीर उत्खननामुळे गिरणा नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला आणि पात्राला गंभीर धोका निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने तक्रारी करत होते. नागरिकांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलले.

महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सुमारे १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास संपूर्ण परिसराला घेराव घालत एकाचवेळी छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे घटनास्थळी वाळू तस्करांची एकच धावपळ उडाली.

अवैध वाळू व्यवसायामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

या यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी –

ही संयुक्त कारवाई उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, मोटार वाहन निरीक्षक अभिजित खरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना नांद्रा मंडळ अधिकारी वैशाली पाटील, नगरदेवळा मंडळ अधिकारी राहुल पवार, कुन्हाड मंडळ अधिकारी भरत नन्नवरे, पाचोरा मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, भडगाव व पाचोरा महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी, पोलीस अंमलदार आणि कोतवाल यांच्या पथकाने सहकार्य केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!