तीन महिने पावसाचा पत्ता नाही; सोयाबीन करपले, बियाणे-खताचा खर्च वाया — शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अनेक भागांत गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सोयाबीनसह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांसाठी बियाणे, खत आणि औषधांवर खर्च करूनही पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नसल्याचे चित्र आहे.
पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या छायेतून मार्ग काढण्याची चिंता सतावत आहे. शेतातील पिके वाळून गेल्याने उत्पादनाची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बियाणे, खत, औषधांचा खर्च वाया
सोयाबीनसह खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. मात्र पावसाने दगा दिल्याने उगवलेली पिकेही सुकून गेली आहेत. त्यामुळे उत्पादन तर दूरच, पण केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे.
विमा कंपनीकडून पाहणीची मागणी
पिकांचे नुकसान झाल्यानंतरही संबंधित विमा कंपन्यांकडून प्रत्यक्ष पाहणी होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी करून पीकविमा आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, अशी मागणी आहे.
शासनाने पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, तसेच दुष्काळी उपाययोजना तत्काळ लागू कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
