विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची वाहतूक करणारे वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान चालकाने वाहन घटनास्थळीच टाकून जवळील केळीच्या बागेतून पळ काढला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास कोल्हन्हावी चौफुली परिसरात वन विभागाचे पथक संशयास्पद वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी टाटा कंपनीचे ७०९ वाहन (क्रमांक MH-18-D-7454) तेथून येताना दिसले.
वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबविण्याचा इशारा करताच चालकाने वाहन जागेवरच सोडले आणि लगतच्या केळीच्या बागेत धूम ठोकली. कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.
त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये सुमारे १३.०० घनमीटर जळाऊ पंचराज जातीचे लाकूड भरलेले आढळले. या लाकूड वाहतुकीबाबत कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे चालकाकडे नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
वन विभागाच्या पथकाने लाकडासह टाटा ७०९ वाहन ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर सोपस्कारांसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा केले आहे. या प्रकरणी वन गुन्हा क्रमांक २१/२०२६, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास वागझिराचे वनपाल करीत आहेत.
अशी झाली कारवाई
ही धडक कारवाई उप वनसंरक्षक सौरिष सहाय (यावल वन विभाग, जळगाव), विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर (धुळे) आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील, वनरक्षक सतीश वाघमारे व आय. बी. चव्हाण यांनी सहभाग घेतला.
वन विभागाचा इशारा : अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर वचक कायम राहणार.
