तुकाराम मुंडेंच्या सर्वेक्षणातून खासगी वैद्यकीय क्षेत्रातील धक्कादायक वास्तव उघड

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साहित्याच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पुढाकारातून झालेल्या सर्वेक्षणात सलाईन नळी, सिरिंज, कॅथेटर आणि ऑक्सिजन मास्कच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सर्वेक्षणानुसार, रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या सलाईनच्या नळीची मूळ किंमत केवळ ११ रुपये असताना ती रुग्णांकडून तब्बल ३२५ रुपये आकारली जाते. म्हणजेच या वस्तूच्या दरात तब्बल २८४४ टक्क्यांची वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याचप्रमाणे सिरिंज ६.७५ रुपयांवरून ५७.२० रुपये, कॅथेटर २९.४४ रुपयांवरून ३९० रुपये, तर ऑक्सिजन मास्क २५ रुपयांवरून २८० रुपये आकारला जात असल्याचे सर्वेक्षणात आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

🔴 केंद्र सरकारला पत्र; दरनियमनाची मागणी

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अशा प्रकारे अतिरिक्त आकारणी होत असल्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून ही लूट तातडीने थांबविण्याची आणि दर निश्चित करण्याची मागणी केल्याचे वृत्तात नमूद आहे.

गेली अनेक वर्षे रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीने अतिरिक्त आकारणी होत असताना त्याला आळा घालण्यासाठी ठोस व्यवस्था काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेषतः वैद्यकीय उपचारांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमतीबाबत पारदर्शकता आणि दरनियमनाची गरज अधोरेखित झाली आहे.

तुकाराम मुंडे यांच्या सर्वेक्षणामुळे खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय साहित्याच्या दरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, आता केंद्र व राज्य सरकार यावर कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!