विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
यावल (जळगाव) – अवैध लाकूड आणि वनसंपत्ती तस्करी रोखण्यासाठी यावल वन विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हरिपुरा राऊंडच्या गस्ती पथकाने जामुनझिरा ते कोरपावली रस्त्यावर सापळा रचत अवैध बांबू वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिपुरा राऊंडचे कर्मचारी नेहमीप्रमाणे जामुनझिरा ते कोरपावली मार्गावर गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून एका संशयित वाहनाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रस्त्यावर लक्ष ठेवले असता भरधाव वेगाने येणारी बोलेरो पिकअप (क्रमांक MH 06 BG 1259) निदर्शनास आली.
वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांना पाहताच चालकाने घाबरून वाहन रस्त्यावरच सोडले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पंचांच्या समक्ष वाहनाची झडती घेतली असता, त्यात विना परवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेले १८०० नग बांबू आढळून आले.
जप्त केलेल्या बांबूची किंमत सुमारे ३४,००० रुपये असून, ३ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन मिळून एकूण ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल पावतीद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे सुरक्षित जमा करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी हरिपुरा येथील वनरक्षकांनी प्राथमिक वनगुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास हरिपुराचे प्रभारी वनपाल एस. बी. इंडे हे करीत आहेत.
ही संपूर्ण यशस्वी कारवाई यावल वन विभाग जळगावचे उप वनसंरक्षक सौरिष सहाय, यावल प्रा. व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. पाटील आणि यावल पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वनपाल एस. बी. इंडे, वनरक्षक श्रीमती एस. पी. भालेराव, वनरक्षक श्रीमती एस. एस. भोंगरे, वनरक्षक एस. बी. पाटणे, योगेश मुंडे आणि चेतन शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
