जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
जळगाव शहराचे प्रमुख नैसर्गिक आकर्षण असलेल्या मेहरूण तलाव परिसरातील वाढते प्रदूषण, अनधिकृत फूड ट्रक्स आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या प्रश्नावर लीग ऑफ शेअर्ड व्हॅल्यूज (L.O.S.) फाऊंडेशनच्या वतीने जळगाव मनपाच्या महापौर सौ. दीपमालाजी काळे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
‘स्वच्छ जळगाव, हिरवे जळगाव’ अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या या निवेदनात तलाव परिसरात प्लास्टिक प्रदूषण, खाद्यपदार्थांचा कचरा आणि वाढती बेशिस्त रोखण्यासाठी ४ प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
1. नियोजनबद्ध धोरण ठरईपर्यंत तलाव परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर तात्पुरती बंदी घालणे.
2. तलाव किनाऱ्यापासून ५० ते १०० मीटर परिसर ‘नॉन-व्हेंडिंग व नो-स्मोकिंग झोन’ घोषित करणे.
3. कचरा व्यवस्थापनाची सोय असलेला स्वतंत्र व नियोजित ‘फूड झोन’ तयार करणे.
4. संध्याकाळच्या वेळी स्वच्छता टिकवण्यासाठी मनपा कर्मचारी व L.O.S. स्वयंसेवकांची संयुक्त देखरेख ठेवणे.
महापौर दीपमालाजी काळे यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत मेहरूण तलावाचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाकडून लवकरच योग्य ती ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी L.O.S. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजल सावकारे, मैनेजिंग संचालक आमोद बियाणी, उपक्रम व्यवस्थापक हेमंत चवन व प्रतिनिधी उपस्थित होते.
