जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

बोरी नदीकाठावरील सानेनगर परिसरात गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली.तरुणाने प्रसंगावधान राखून जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेत तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना

योगेश मनोज पाटील हा तरुण गुरे चारण्यासाठी गेलेल्या मित्रांना भेटण्यासाठी बोरी नदीकाठाजवळ गेला होता. झुडपांच्या परिसरात तो बसलेला असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने योगेशच्या शर्टला पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तर योगेशने स्वतःची सुटका करण्यासाठी पुढे ओढ घेतली. या झटापटीत तो घाबरून गेला.योगेशने बिबट्याला ठोसा मारून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेरीस त्याने मोठमोठ्याने ‘वाचवा, वाचवा’ असा आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. आवाजामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.

आवाजाने वेधले नागरिकांचे लक्ष

दरम्यान, आवाजाच्या दिशेने जाणाऱ्या एका बैलगाडीचालकाने धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी यांनी वनरक्षक योगेश पाटील, मनीषा मोरे यांच्यासह वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. पथकाने परिसराची पाहणी केली.

दरम्यान, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह काही नागरिकांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.वनाधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या परवानगीने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे तसेच पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वनपाल गुलाब पिंजारी यांनी दिली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!