विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

बोदवड – हरणखेड परिसरात पशुधनही सुरक्षित नाही; प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संताप

बोदवड : बोदवड तालुक्यातील हरणखेड व आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या सततच्या चोऱ्यांना कंटाळून अखेर हरणखेड गावातील 20 ते 25 तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन रात्री गावात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवस झालेल्या चोरीच्या घटनांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या दिवशी एका व्यक्तीच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली, तर दुसऱ्या दिवशी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेला बैल चोरून नेण्यात आला. मोटारसायकल चोरीची तक्रार बोदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ एकच दिवस रात्रीची गस्त घातल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ मंडळी व तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच गावाची राखण करण्याचा निर्णय घेतला आहे.

गस्त घालत असताना नुकतेच गावाच्या सीमेलगत दोन अज्ञात इसम संशयास्पदरित्या फिरताना तरुणांना आढळले. तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता, दोन्ही इसम अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवरून पसार होण्यात यशस्वी झाले.

“चोरटे आता पशुधनालाही सोडत नाहीत. गावात सतत चोऱ्या होत आहेत आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला,” अशी कैफियत गावातील तरुण गजानन कृष्णा चिनकर यांनी मांडली.

सध्या तरुणांच्या या रात्रगस्तीमुळे चोऱ्यांना काही प्रमाणात आळा बसेल अशी आशा ग्रामस्थांना आहे, मात्र पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!