विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून दोन भीषण दुर्घटना घडल्या असून, या दुर्घटनांमध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिल्लोड तालुक्यातील दहिगाव आणि कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात या घटना घडल्या आहेत.
शेतातील झोपडीवर वीज कोसळली; पती-पत्नी ठार
पहिली घटना सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे घडली. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करणाऱ्या एका कुटुंबाने पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील झोपडीचा आसरा घेतला होता. मात्र त्याच झोपडीवर अचानक कडाडून वीज कोसळली. या दुर्घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
शेतात काम करताना काळाचा घाला; दोन महिला आणि चिमुकलीचा मृत्यू
दुसरी दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात घडली. शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळल्याने तीन जणांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा (चिमुकली) समावेश आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शहरात ढगफुटीसदृश पाऊस, ग्रामीण भागात मात्र प्रतीक्षा कायम
दरम्यान, याच दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको आणि टीव्ही सेंटर परिसरात अवघ्या १० ते १५ मिनिटांत ढगफुटीसदृश जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. एकीकडे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
प्रशासन घटनास्थळी; जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार
या दोन्ही घटनांची माहिती मिळताच आमदार संजना जाधव, तहसीलदार सारिका भगत आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण दहिगाव, पिशोर परिसर आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
