विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव : मतदार यादी सखोल आणि अचूक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ राबविला जात आहे. या अंतर्गत नागरिकांना आपली नावे नोंदविता यावीत यासाठी जिल्हाभरात १९ व २० सप्टेंबर तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे आणि हरकती स्वीकारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या काळात नवीन मतदार नोंदणी, नावातील चुका दुरुस्त करणे आणि नाव वगळणे यासाठीचे अर्ज स्वीकारले जातील. प्रारूप यादीत नाव नसलेले, स्थलांतरामुळे किंवा गैरहजर असल्याने नाव वगळले गेलेले नागरिक, तसेच १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व युवक-युवतींना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची ही महत्त्वाची संधी आहे.

शिबिराच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. संबंधित केंद्रावरच नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

नवमतदारांसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, शाळा आणि महाविद्यालय स्तरावर जनजागृती केली जात आहे. या शिबिरात महिला आणि दिव्यांग मतदारांच्या नोंदणीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र नागरिक, नवमतदार आणि ज्यांची नावे अद्याप प्रारूप यादीत आलेली नाहीत, अशा सर्वांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्राला भेट देऊन या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी किंवा दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!