जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील प्राथमिक विभागातर्फे पर्यावरणपूरक तोरणमाळ निर्मितीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आंब्याची पाने, विविध प्रकारची पाने, फुले आणि बिया यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने आकर्षक तोरणमाळा तयार केल्या. नैसर्गिक साहित्याचा कल्पकतेने वापर करत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवासाठी सजावट साकारण्यासोबतच महाराष्ट्राच्या पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख करून घेतली.

प्लास्टिक व कृत्रिम सजावटीला पर्याय म्हणून निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेषतः विविध बियांचा वापर करून तयार केलेल्या तोरणमाळांमधून ‘सजावटही पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी नातेही घट्ट’ असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, पारंपरिक कला आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्थानिक नैसर्गिक साहित्याला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, हस्तकौशल्याला, पारंपरिक कलाज्ञानाला आणि पर्यावरणीय जाणीवेला चालना मिळाली. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता तो संस्कृती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्सव व्हावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्साहात राबविला. पर्यवेक्षक निलेश पवार, उपशिक्षिका अनिता सोनवणे, करिष्मा परदेशी व गायत्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!