जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव : जागतिक ओझोन दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या वतीने “माझा परिसर, स्वच्छ परिसर” हा नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरासह स्वामी समर्थ चौक परिसरात श्रमदान केले. परिसरातील झाडांच्या आजूबाजूला वाढलेले अनावश्यक गवत, पालापाचोळा व कचरा विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्वच्छ केला. गोळा झालेल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना ओझोन थराचे महत्त्व, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “माझा परिसर, माझी जबाबदारी” या भावनेतून प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखावी, कचरा योग्य ठिकाणी टाकावा आणि झाडांचे संवर्धन करावे, असा संदेश देण्यात आला.

“माझा परिसर, स्वच्छ परिसर – स्वच्छतेतून पर्यावरण संवर्धन” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. इको क्लबच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची सवय आणि निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आव्हाड मॅडम यांनी केले. पर्यवेक्षिका शीतल कोळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ सातत्याने पुढे न्यावी, असे आवाहन केले. इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!