जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे सकारात्मक आश्वासन; डे-केअर सेंटर स्थलांतरासाठीही तातडीने प्रयत्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगाव जिल्ह्यातील हिमोफिलियाग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियासाठी आवश्यक असलेले जीवनरक्षक फॅक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील आठ दिवसांत फॅक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी दिले आहे. तसेच मोहाडी येथील हिमोफिलिया डे-केअर सेंटर जळगाव शहरातील नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठीही तातडीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिमोफिलिया सोसायटी धुळेच्या वतीने हिमोफिलियाग्रस्त रुग्णांच्या विविध अडचणींबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात सध्या फॅक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक फॅक्टर वेळेत उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात फॅक्टरचा नियमित व पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात आली.
हिमोफिलिया हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या घटकांची कमतरता असल्यामुळे होणारा आनुवंशिक रक्तविकार आहे. अशा रुग्णांना रक्तस्त्राव झाल्यास तो नियंत्रित करण्यासाठी फॅक्टर VIII किंवा IX यांसारख्या घटकांची आवश्यकता असते. बाह्य दुखापतीबरोबरच शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्त्राव झाल्यासही वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. उपचारास विलंब झाल्यास सांध्यांमध्ये वारंवार रक्तस्त्राव होऊन दीर्घकालीन शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. तर मेंदू किंवा अन्य महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तस्त्राव झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
दरम्यान, हिमोफिलिया डे-केअर सेंटर सध्या मोहाडी येथील महिला रुग्णालयात असल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा प्रवास रुग्णांसाठी जोखमीचा ठरू शकतो. त्यामुळे डे-केअर सेंटर जळगाव शहरातील मध्यवर्ती नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली.
हिमोफिलिया सोसायटी धुळेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र ॲडव्होकेसीचे सदस्य आणि हिमोफिलियाग्रस्त रुग्णांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांची भेट घेऊन रुग्णांच्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. रुग्णांची परिस्थिती समजून घेत डॉ. सांगळे यांनी प्रशासनाच्या पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पुढील आठ दिवसांत फॅक्टर उपलब्ध करून देण्याबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) हिमोफिलिया रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डे-केअर सेंटर नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्याबाबतही प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने जिल्ह्यातील हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना उपचाराच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र ॲडव्होकेसीचे जळगाव जिल्हा सदस्य धनंजय मंगरूळकर, ॲड. पवन नेवे, पत्रकार अतिख खान, संपादक गंगाधर बोदडे तसेच हिमोफिलियाग्रस्त रुग्ण सोहेल खान उपस्थित होते. प्रशासनाने रुग्णांच्या गंभीर प्रश्नाची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल हिमोफिलिया सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
