जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.

रावेर | निंभोरा : सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या निंभोरा तसेच परिसरातील सुमारे २० गावांचा आरोग्यभार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘१०८’ रुग्णवाहिका निंभोरा येथून पार्ला येथे हलविण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वसीम भैय्या शेख यांनी निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली. पाहणीदरम्यान प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मनुष्यबळाअभावी अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना उपचारासाठी अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, निंभोरा येथील ‘१०८’ रुग्णवाहिका तातडीने पूर्ववत करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक डॉक्टर, कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रश्नाची दखल न घेतल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वसीम भैय्या शेख आणि सामाजिक सेवा अध्यक्ष सोएब खान युनूस खान यांनी दिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भाईकर यांच्या भूमिकेकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!