जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.
रावेर शहर सध्या अनेक गंभीर समस्यांनी वेढलेले असताना नगरपालिका मात्र नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम करत आहे, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम भैया शेख यांनी केला आहे. शहरात मूलभूत सुविधांचा पूर्ण बोजवारा उडालेला असताना अवाजवी टॅक्स लावून जनतेची लूट सुरू असल्याचे सांगत त्यांनी नगरपालिका प्रशासनाला जाब विचारला आहे.
आज वसीम भैया शेख यांनी रावेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन अंतिम इशारा दिला आहे. लवकरच निर्णय न घेतल्यास थेट मा. न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्ष जागेवरची परिस्थिती भयानक –
वसीम भैया शेख म्हणाले, “आपण टॅक्स घेतोय, पण हा टॅक्स जनता रक्ताचं पाणी करून, घाम गाळून भरते. त्या जनतेला आपण दिलंय तरी काय?
आज जर तुम्ही एखाद्या सामान्य कॉलनीमध्ये गेलात, तर चित्र भयानक आहे. घराच्या बाहेर पडताच दारासमोर घाण पाणी पसरलेलं असतं. सांडपाण्याला जायला जागा नाही. गटारी एकतर नाहीत किंवा पूर्णपणे तुंबलेल्या आहेत. त्यामुळे डास, दुर्गंधी आणि रोगराई वाढली आहे. चांगले रस्ते नाहीत, ठिकठिकाणी खड्डे आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर अतिशय वाईट आहे, दर्जेदार पाणी मिळतच नाही.
मग जेव्हा तुम्ही एकही सुविधा देत नाही, तेव्हा कोणत्या तोंडाने आणि कोणत्या हक्काने तुम्ही जनतेकडून 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचा अवाजवी टॅक्स वसूल करता? आधी सुविधा द्या आणि मग टॅक्स मागा.”
“तुम्ही जनतेचे नोकर आहात” – वसीम भैया यांचा घणाघात
यावेळी प्रशासनाला सुनावताना वसीम भैया शेख म्हणाले, “माझ्या शहराच्या नागरिकांवर कोणताही अन्याय होत असेल तर मी कुठेही सहन करणार नाही. हे माझे शहर आहे, माझा तालुका आहे.
तुम्ही हे विसरू नका की तुम्ही जनतेचे नोकर आहात. जनता जे टॅक्सचे पैसे भरते, त्याच पैशातून तुम्हाला पगार मिळतो. तुम्ही जनतेची सेवा करायला पाहिजे. केबिनमध्ये बसून वटवटीची उत्तरे देण्यापेक्षा तुम्ही स्पॉटवर जाऊन, वॉर्डा-वॉर्डात जाऊन जनतेच्या समस्या काय आहेत ते डोळ्यांनी बघा. त्या समस्या लवकरात लवकर सॉल्व करा.”
वसीम भैया यांच्या 3 ठोस मागण्या –
१. आधी सुविधा, मग टॅक्स : शहरात पिण्याचे शुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, गटार सफाई आणि कचरा व्यवस्थापन त्वरित सुरळीत करा. दर्जेदार रस्ते द्या.
२. अवाजवी टॅक्स तात्काळ रद्द करा : नागरिकांना आलेली 40,000 रुपयांपर्यंतची अवास्तव बिले तात्काळ मागे घ्या आणि रास्त, कमीत कमी टॅक्स लावा.
३. पारदर्शक फेरमोजणी करा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक घराची पारदर्शक पद्धतीने फेरमोजणी करून योग्य कर आकारणी करा.
न्यायालयात जाण्याचा अंतिम इशारा –
नगरपालिका प्रशासनाने या मागण्यांवर 8 दिवसात ठोस निर्णय घेतला नाही, तर रावेरच्या जनतेच्या हक्कासाठी थेट न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा अंतिम इशारा वसीम भैया शेख यांनी दिला आहे.
