नाशिक जिल्हा प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड.
नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने सिडको परिसरातुन चोरीची ॲक्टिवा मोपेड विक्रीसाठी आणणाऱ्या एका सराईत संशयित आरोपीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हेशाखा युनिट-२ चे पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तातखान पठाण आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना संभाजी स्टेडियम, सिडको येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे युनिटचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गितेमळा, मुंबईनाका, नाशिक) असल्याचे सांगितले. त्याच्या झडतीत व विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने मोपेड गाडी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिवा जप्त केली आहे. या कारवाईमुळे मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
