नंदुरबार तालुक्यातील ५ गुन्हे उघड, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त …
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नंदुरबार शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी व शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८५ हजार १०० रुपये किमतीच्या पाच मोटारी आणि वायर हस्तगत करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेती साहित्य व इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन मालमत्ता गुन्ह्यांना आळा घालण्याचे आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश सर्व ठाणे प्रभारी व गुन्हे शाखेला दिले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींची नावे –
१) गणेश आप्पा भिल (वय ३०)
२) सोमा गोमा भिल (वय २८)
३) बादल मनोज भिल (वय २१)
४) समाधान रविंद्र भिल (वय २०)
(सर्व रा. खोकराळे, ता. व जि. नंदुरबार) त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या आरोपींच्या अटकेमुळे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ४६६/२०२५, ४६७/२०२५, ४६८/२०२५, ४६९/२०२५ आणि अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २७८/२०२५ असे एकूण पाच गुन्हे (कलम भारतीय न्याय संहिता ३०३(२)) उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोहेकॉ दिनेश चिने, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, पोअं सचिन सैंधाणे, यशोदिप ओगले आणि राहुल पांढरकर यांच्या पथकाने केली.
