जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथील गणेश घाटावर श्री गणेश विसर्जनाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेश घाटाची पाहणी करून विसर्जनाच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.

यावेळी संबंधित विभागांना स्वच्छता, सुरक्षा, भाविकांच्या सुविधा तसेच आवश्यक मनुष्यबळाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी घाट परिसरातील स्वच्छता आणि व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच निर्माल्य संकलनासाठी पुरेशा प्रमाणात निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात आली.
दरम्यान, गणेशभक्तांनी निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत न आणता कागदात किंवा कागदी पिशवीत आणावे आणि ते थेट निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणरायाला निरोप देताना तलाव परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदाचा गणेश विसर्जन सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
