विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील दहिवद बसस्थानकावर मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक विकास शिरोळे, हवालदार मिलिंद कुमावत, प्रकाश कोळी, कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील आणि दीपक महाजन हे रात्री गस्त घालत होते. त्यावेळी दहिवद बसस्थानकावर MH 18 S 662 क्रमांकाची ओमनी गाडी संशयास्पद अवस्थेत उभी दिसली. पोलिसांचे पथक पाहताच चालकाची घाबरगुंडी उडाली.
पोलिसांनी वाहनात काय आहे याची विचारणा केली असता, चालकाने किराणा सामान असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी वाहन थेट मेहुणबारे पोलीस ठाण्यात नेले. तेथे झडती घेतली असता, आतमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेला विमल कंपनीचा पानमसाला व तंबाखू भरलेला आढळला.
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ३ लाख ३२ हजार रुपये किमतीचा गुटखा, गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख रुपयांची ओमनी कार आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
चौकशी दरम्यान वाहन चालकाने आपली ओळख हितेश अनिल अहिरराव, वय २७, रा. मेहुणबारे अशी सांगितली. हा माल आपण धुळे येथील बिलाल नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली त्याने दिली आहे. विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने हा प्रतिबंधित माल वाहून नेत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले करीत आहेत.
