विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
बारामती – बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची घ टना घडली आहे. सुमारे ४० विद्यार्थी असलेली ही बस घाटात उलटली असून, या अपघातात ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही बस सुटते. कुसेगाव, पडवी, गायकवाड मळा मार्गे सुपे घाटातून ही बस विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात जात असते. दररोजप्रमाणे आजही विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना सुपे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून विचारपूस
दरम्यान, या अपघाताची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना योग्य उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
रोहित पवार यांची टीका; एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची एसटी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र, ही घटना एसटी महामंडळाच्या सेवेबाबत चिंता वाढवणारी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यातही स्वारगेटहून बारामतीकडे जाणाऱ्या दोन एसटी बस नादुरुस्त झाल्याचा दाखला देत त्यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका केली. या अपघाताची सखोल चौकशी करून भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रशासनाकडून या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
