जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

खरगोन जिल्ह्यात जाऊन संशयितांचा शोध; चोरीच्या जनावरांचा तपास सुरू

कासोदा : कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीला गेलेल्या १८ शेळ्या आणि ५ बोकड अशा एकूण २३ जनावरांच्या चोरीचा गुन्हा कासोदा पोलिसांनी उघडकीस आणला असून, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कासोदा शिवारातील शेतातील शेडमधून अज्ञात चोरट्यांनी २३ शेळ्या-बोकड चोरून नेले होते. याप्रकरणी दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथक तयार करून तांत्रिक तपासासह गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पथकाने मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाणी/खरगोन परिसरात जाऊन संशयितांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, आरोपींची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड पोउनि किशोर पाटील, पोहेकॉ किरण गाडीलोहार आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

चोरीचा गुन्हा उघडकीस आणत मध्यप्रदेशापर्यंत तपासाची धडक पोहोचवल्याने कासोदा पोलिसांच्या या कारवाईची परिसरात चर्चा आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!