जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव : जिल्ह्यात रविवारी झालेल्या धुव्वाधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात तब्बल ४२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरणार असून जळगाव व नाशिक परिसरात पुढील काही दिवस हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आज आणि उद्या जळगावमध्ये हलक्या सरींची शक्यता असून १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान जळगाव व नाशिकमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा उत्साह वाढणार आहे.
गणेश देखावे पाहण्यासाठी भक्तांची लगबग
सोमवारी श्री गणेशाचे उत्साहात आगमन झाल्याने शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचे वातावरण रंगले आहे. यंदाचा गणेशोत्सव ११ दिवस चालणार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह आहे. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने बाजारपेठांमध्येही नागरिकांची लगबग वाढली आहे.
आता पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा नसल्याने गणेश मंडळांचे आकर्षक देखावे, सजावट आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांना रात्री उशिरापर्यंत बाहेर पडता येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा नाही
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात सध्या मुसळधार पावसाचा इशारा नसल्याचे हवामान अंदाजातून स्पष्ट होत आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे.
१६ सप्टेंबरला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १७ आणि १८ सप्टेंबरला कोकण-गोवा व विदर्भातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, १५ ते १८ सप्टेंबरदरम्यान जळगाव परिसरासाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसल्याने गणेश भक्तांना उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
