विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

छत्रपती संभाजीनगर : अमरावती येथील स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, रुग्णालय प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे ९ नवजात बालकांसह एकूण ५८ रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले.

एसीमधून धूर निघताच सतर्कता

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २ वाजून १० मिनिटांनी NICU विभागातील एसीमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

खबरदारीचा उपाय म्हणून NICUमधील नऊ नवजात शिशूंना तसेच आजूबाजूच्या वॉर्डमधील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यानंतर काही वेळात आगीची परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णालय परिसरात एकच धावपळ उडाली.

१० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण

पहाटेच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य हाती घेत शर्थीचे प्रयत्न केले आणि अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग रुग्णालयाच्या इतर भागात पसरण्याचा मोठा धोका टळला.

९ बालकांना विविध रुग्णालयांत हलविले

NICU मध्ये उपचार घेत असलेल्या सर्व नऊ नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यापैकी पाच बालकांना घाटी रुग्णालयात, तीन बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

ज्या पहिल्या मजल्यावर NICU विभाग आहे, त्या ठिकाणी एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये NICUमधील नऊ बालकांसह जनरल विभागातील ३६ आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश होता. सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

३० रुग्णवाहिका, पोलीस आणि कर्मचाऱ्यांची मदत

बचावकार्य जलद गतीने पार पाडण्यासाठी तब्बल ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या. जवाहरनगर पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षिततेसाठी असेंब्ली पॉईंटवर एकत्र करण्यात आले. सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मोठे नुकसानही टळल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

NICU विभागाची स्वच्छता आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून, सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आलेल्या रुग्णांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात येणार असल्याचे डॉक्टर शोयब हाश्मी यांनी सांगितले. त्यानंतर रुग्णालयाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येईल.

वेळीच धूर लक्षात येणे, रुग्णालय प्रशासनाची तत्परता, अग्निशमन दलाचे जलद बचावकार्य आणि पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अमरावतीतील दुर्घटनेनंतर ही घटना घडल्याने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!