जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पारंपरिक दहीहंडी उत्सवाला शैक्षणिक उपक्रमाची अभिनव जोड देत ‘कौशल्याची हंडी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. दहीहंडीच्या पारंपरिक उत्साहासोबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, तर्कशक्तीला आणि विविध कौशल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांचे ‘मुरलीधर’, ‘गोवर्धन’, ‘गोपाळ’ आणि ‘पार्थ’ असे चार गट करण्यात आले. प्रत्येक गटाला भाषा, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, तर्कशक्ती, निरीक्षणशक्ती, समस्या निराकरण, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्यांवर आधारित प्रश्न व आव्हाने देण्यात आली.
प्रश्नांची उत्तरे देताना विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता विचार करून निर्णय घेणे, वेळेचे नियोजन करणे, संघातील सदस्यांशी चर्चा करणे आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे या कौशल्यांचा प्रभावी वापर केला. प्रत्येक योग्य उत्तर व यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या कृतीसाठी गुण देण्यात आले. विविध फेऱ्यांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या स्पर्धेत ‘गोपाळ’ गटाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विजेत्या गटात लक्ष्मी दुर्वे, रितिका पाटील, आरोही सोनार, सानवी कोठाडे आणि प्रियंका सूर्यवंशी या विद्यार्थिनींचा समावेश होता. अचूक उत्तरे, उत्तम संघभावना, प्रसंगावधान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या गटाने विजेतेपद मिळविले.
“हंडी फोडायची नाही, कौशल्याची उंची गाठायची!” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, तर्कशक्ती, संवादकौशल्य, टीमवर्क, निर्णयक्षमता, समस्या निराकरण आणि सर्जनशील विचार यांसारख्या २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास झाला.
श्रीकृष्णाच्या जीवनातील चातुर्य, नेतृत्व, प्रसंगावधान आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांना समजावी, तसेच पारंपरिक सणाला शैक्षणिक मूल्यांची जोड मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे “खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून कौशल्य” ही संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकांनी प्रश्ननिर्मिती, गटनियोजन, वेळेचे व्यवस्थापन व गुणांकनाची जबाबदारी सांभाळली.
पारंपरिक दहीहंडीला शैक्षणिक आणि कौशल्याधारित स्वरूप देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.
