DLP चा धडाका! निधीची वाट न पाहता ठेकेदारांकडूनच रस्ते दुरुस्ती
नगरसेविका वैशाली अमित पाटील व नगरसेवक नितीन सपके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव : शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असताना रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेच्या निधीची वाट पाहण्याऐवजी संबंधित ठेकेदारांचीच जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेविका वैशाली अमित पाटील व नगरसेवक नितीन सपके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर DLP (Defect Liability Period) अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच DLPच्या तरतुदीचा अशा प्रभावी पद्धतीने वापर होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता नागरिकांना रस्ते दुरुस्तीचा दिलासा मिळणार आहे.
प्रभाग १३ मधील पाच प्रमुख रस्त्यांचा समावेश
DLP अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील महाबळ परिसरासह पाच प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. यामध्ये डी मार्ट ते गिरणा टाकी, काव्य रत्नावली चौक ते राजमाता जिजाऊ चौक, संभाजीनगर स्टॉप ते मोहाडी रोड आणि मोहाडी रोड ते संत गाडगे बाबा चौक या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.
या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
“महापालिकेचा पैसा खर्च कशासाठी?”
रस्ता तयार झाल्यानंतर ठरावीक कालावधीपर्यंत त्याची गुणवत्ता, दोष आणि आवश्यक दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. या कालावधीत रस्ता खराब झाल्यास ठेकेदाराकडूनच दुरुस्ती करून घेण्याची तरतूद आहे.
याच मुद्द्यावर भर देत वैशाली पाटील यांनी “महापालिकेचा पैसा खर्च कशासाठी? ठेकेदाराची जबाबदारी असेल तर त्याच्याकडूनच काम करून घ्या,” अशी ठाम भूमिका घेतली.
आता संपूर्ण शहरातील DLP रस्त्यांचा शोध
प्रभाग १३ मध्ये DLPचा वापर करून दुरुस्ती सुरू झाल्यानंतर आता शहरातील इतर DLP रस्त्यांकडेही लक्ष वेधले गेले आहे. कोणत्या रस्त्याची DLP मुदत शिल्लक आहे, संबंधित ठेकेदार कोण आहे, कामाची किंमत किती आहे आणि सध्या रस्त्याची अवस्था काय आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मागविण्यात येत आहे.
DLPची मुदत शिल्लक असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदारांकडूनच करून घेतल्यास महापालिकेच्या निधीची बचत होऊ शकते आणि नागरिकांना तातडीने चांगले रस्ते उपलब्ध होऊ शकतात.
इतर नगरसेवकांनीही पुढाकार घ्यावा
प्रभाग १३ प्रमाणेच शहरातील इतर प्रभागांमध्येही DLPची मुदत शिल्लक असलेल्या रस्त्यांचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेण्याची मागणी आता जोर धरू शकते. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त खर्चाशिवाय शहरातील अनेक खड्डेमय रस्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
“नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा पुन्हा त्याच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्याआधी ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करा. निधीची वाट पाहण्यापेक्षा करारातील तरतुदींचा वापर करून नागरिकांना चांगले रस्ते देणे, हाच आमचा उद्देश आहे.”
— वैशाली अमित पाटील, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १३, जळगाव शहर महानगरपालिका.
