जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट दप्तर – हलके दप्तर’ हा अभिनव उपक्रम हॅकाथॉन पद्धतीने राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विचार करून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध स्मार्ट उपाय शोधले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याबरोबरच एकत्व, सहकार्य, सर्जनशीलता व समस्या निराकरणाची वृत्ती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

हॅकाथॉन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसमोर दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या ठेवून त्यावर गटाने विचारमंथन करणे, कल्पना मांडणे, योग्य उपाय निवडणे आणि त्याची प्रत्यक्ष मांडणी करणे अपेक्षित असते. याच पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांसमोर ‘दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आपण कोणता स्मार्ट उपाय शोधू शकतो?’ हे आव्हान ठेवण्यात आले.
विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटाने आपल्या दप्तरातील पुस्तके, वह्या, लेखनसाहित्य व इतर वस्तूंचे निरीक्षण केले. आवश्यक व अनावश्यक साहित्याची वर्गवारी करताना दप्तराचे ओझे वाढण्याची कारणे विद्यार्थ्यांनी स्वतः शोधली. त्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कल्पना मांडत एकत्रित चर्चेतून योग्य उपाय निवडला.
विद्यार्थ्यांनी ‘वेळापत्रकानुसारच पुस्तके व वह्या आणणे’, ‘Smart Bag Checklist’ तयार करणे, अनावश्यक साहित्य दप्तरात न ठेवणे तसेच वर्गात आवश्यक शैक्षणिक साहित्याची व्यवस्था करणे अशा विविध कल्पना मांडल्या. काही गटांनी आपल्या उपायांचे पोस्टर, आराखडे व प्रतिकृती तयार करून त्यांचे सादरीकरण केले.
उपक्रमातील विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ कल्पना मांडून न थांबता त्यांचा परिणाम तपासला. ‘पूर्वीचे दप्तराचे वजन – स्मार्ट उपाय – नंतरचे दप्तराचे वजन’ अशा पद्धतीने वजनाची नोंद करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य नियोजन केल्यास दप्तराचे अनावश्यक ओझे कमी करता येते, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या उपक्रमातून Critical Thinking, Creativity, Collaboration, Communication आणि Problem Solving या २१व्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास साधण्यात आला. एकट्याने समस्या सोडविण्यापेक्षा ‘एकत्र विचार करा, एकमेकांचे ऐका आणि सर्वोत्तम उपाय शोधा’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी काम केले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वेळापत्रकानुसार आवश्यक साहित्यच दप्तरात ठेवणे, दररोज दप्तराची तपासणी करणे आणि अनावश्यक वस्तू टाळणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘दप्तर हलके, विचार मोठे’ या संदेशातून घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्येकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. हॅकाथॉनच्या माध्यमातून ‘समस्या ओळखा–एकत्र विचार करा–उपाय शोधा–कृती करा–परिणाम तपासा’ या प्रक्रियेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी उपक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागातून आणि कल्पकतेतून साकारलेला हा उपक्रम २१व्या शतकातील कौशल्याधारित शिक्षणाचा अभिनव नमुना ठरला.
