विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
मुंबई : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीत सुरुवातीपासूनच अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी समोर येत आहेत. कार्ड रिचार्ज करताना प्रवाशांच्या भरलेल्या रकमेपैकी काही रक्कम कपात होत असल्याने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
100 रुपयांच्या रिचार्जवर मोठी कपात
एजंटकडून एनसीएमसी कार्डमध्ये 100 रुपयांचा टॉपअप केल्यानंतर कार्डमध्ये प्रत्यक्षात केवळ 86.14 रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येक 100 रुपयांमागे 13.86 रुपये कमी होत आहेत. एजंटला देण्यात येणाऱ्या मर्चंट डिस्काउंट रेटचा भार अप्रत्यक्षपणे प्रवाशांवर पडत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, एसटीच्या वाहकाकडून कार्ड रिचार्ज केल्यास 100 रुपयांपैकी 98 रुपये कार्डमध्ये जमा होतात. यामध्ये गेटवे शुल्क म्हणून दोन रुपये आकारले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकाच रिचार्जसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी रक्कम कार्डमध्ये जमा होत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्व्हरच्या अडचणींमुळे प्रवाशांच्या रांगा
एनसीएमसी प्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व्हरवरील वाढत्या ताणामुळे कार्ड रिचार्ज न होणे, कार्ड सक्रिय करण्यात अडथळे येणे तसेच कार्ड रीड न होण्यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही अपेक्षित सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.
14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत
तांत्रिक अडचणींमुळे एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट देता न आल्यास 14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, ज्यांची नोंदणी झाली आहे मात्र अद्याप कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणीची पावती दाखवून 30 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठा प्रश्न
ग्रामीण भागात एनसीएमसी कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. अनेक गावांपासून एसटी आगार किंवा तालुक्याचे ठिकाण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. केवळ कार्ड रिचार्ज करण्यासाठी इतका प्रवास करणे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.
त्यामुळे प्रत्येक एसटी वाहकाकडे रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा ग्रामपंचायत स्तरावर रिचार्जची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रिचार्जची यंत्रणा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत सवलतीसाठी आधार कार्डचा पर्याय कायम ठेवण्याची मागणीही पुढे आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
एनसीएमसी प्रणालीमुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी वाहकांना पुरेसे प्रशिक्षण न देता प्रणालीची अंमलबजावणी केल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कार्ड टॉपअप करताना वारंवार एरर येणे, मशीन हँग होणे आणि तांत्रिक बिघाडांमुळे वाहकांना प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या समस्या तातडीने दूर न केल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘एनसीएमसी कार्ड नेमके कोणाच्या सोयीसाठी?’
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सुलभता आणि सवलत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एनसीएमसी कार्ड व्यवस्था सध्या अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. रिचार्जमधील कपात, सर्व्हरच्या समस्या आणि ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव यामुळे ‘एनसीएमसी कार्ड नेमके प्रवाशांच्या सुविधेसाठी की त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यासाठी?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
