विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित
दिपनगर, ता. भुसावळ राजस्थानहून पत्र्यांचा माल घेऊन नागपूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील फेकरी-साक्री पुलावर दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी होऊन वाहनाच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रवीण दरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये चालक गंभीर अवस्थेत अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला मोठ्या प्रयत्नानंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यात पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही मोलाची मदत केली.
चालकाची सुटका होताच त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पुलावरील मार्गावर वाहतूक कोंडी होऊन तब्बल 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पोलीस उपअधीक्षक प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे गंभीर अवस्थेत अडकलेल्या चालकाला वेळेत बाहेर काढण्यात यश आले. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
