विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

बोदवड : तालुक्यातील जामठी गावातील रहिवासी असलेल्या खासगी शिकवणी वर्ग चालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांचा जमाव आक्रमक झाला. जमावाने संशयिताच्या मूळ गावात धाव घेत घरांवर दगडफेक केली, तर वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना घडली.

परिस्थिती चिघळत असल्याने पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. जिल्ह्यातील विविध भागांतून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त घटनास्थळी पाठविण्यात आला.

भुसावळ रस्त्यावरील खासगी क्लासेसवरून गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे बोदवड शहरातील भुसावळ रस्त्यावरील एका इमारतीत खासगी शिकवणी वर्ग आहेत. या ठिकाणी पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविले जाते. अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत गंभीर आरोप समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली.

घटनेनंतर संतप्त जमाव संशयिताच्या मूळ गावात पोहोचला. प्राथमिक माहितीनुसार, यावेळी तीन दुचाकींना आग लावण्यात आली, तर तीन कारची तोडफोड करण्यात आली. नुकसान झालेल्या काही वाहनांचा संबंध संशयिताच्या नातेवाइकांशी असल्याचे सांगितले जात आहे.

नातेवाइकांच्या घराजवळही उद्रेक

परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्यानंतर संशयिताचे कुटुंबीय गावातील नातेवाइकांच्या घरात आश्रयाला असल्याची माहिती जमावाला मिळाली. त्यानंतर त्या परिसरातही दगडफेक आणि तोडफोड झाल्याची माहिती समोर आली.

या घटनेत एका कारसह तीन दुचाकी आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्राथमिक स्तरावर समोर आले आहे.

जमावाला रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर

जमाव नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.

मध्यरात्रीपर्यंत तणाव कायम असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील विविध भागांतून अतिरिक्त पोलिस कुमक मागवली.

संशयिताच्या कुटुंबातील नऊ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

जमावाचा वाढता रोष आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन संशयितासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि लहान मुलांना मिळून एकूण नऊ जणांना पोलिसांनी रात्री सुमारे १२ वाजता सुरक्षितस्थळी हलविले.

दरम्यान, बोदवड पोलिस ठाण्यात पीडितेचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना

रात्री सुमारे १२.१० वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे पीडितेच्या नातेवाइकांसह तणावग्रस्त गावाच्या दिशेने रवाना झाले. संतप्त नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले.

या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!