विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
वरणगाव : तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास करत तिचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास आणि संशयितांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करत पोलिसांनी मुलीचा ठावठिकाणा शोधून तिला सुरक्षित ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी तालुक्यातील एक अल्पवयीन शाळकरी मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी वरणगाव पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार संबंधिताविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत विविध दिशांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान एका संशयिताचे लोकेशन सुरत परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पथक सुरतच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, संशयित मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा देत असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, पोलिसांनी त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे सुरू ठेवला.
तपास पथक सुरतच्या दिशेने जात असताना संशयिताच्या मित्राचा फोन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या संपर्काचा माग काढत पोलिसांनी पुन्हा कल्याणच्या दिशेने तपासाची सूत्रे वळवली. कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर संशयित व अल्पवयीन मुलीच्या वर्णनावरून शोधमोहीम राबविण्यात आली.
अखेरीस पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून, संशयिताला ताब्यात घेत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची चर्चा परिसरात सुरू आहे.
