स्वयंसेवकांची पथके सज्ज; तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षणातून विकासाचे नवे नियोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी शाळा व अंगणवाडी ऑडिट/मूल्यांकन तसेच क्षेत्रीय सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांचे सर्वेक्षण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्वयंसेवकांची निवड, कार्यशाळा व प्रशिक्षणाचे नियोजन, तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षण तसेच विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

या उपक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, DSU जळगाव (MahaSTRIDE), MSW महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC) आणि नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची पथके गठित करण्यात येणार आहेत.

निवड झालेल्या स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यामार्फत शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या स्तरावर प्रत्यक्ष ऑडिट व क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची अद्ययावत, वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे आवश्यक सुविधा, दुरुस्ती, सुधारणा आणि विविध विकासकामांचे अधिक प्रभावी नियोजन करण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या मूलभूत सुविधांपासून ते आवश्यक विकासकामांपर्यंतच्या बाबींचा प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित आढावा घेता येणार असून, भविष्यातील शैक्षणिक व बालविकासाच्या नियोजनाला अधिक अचूक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!