10.27 लाखांचा मुद्देमाल जप्त; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह होंडा अमेझ कार ताब्यात, पाच जणांविरोधात गुन्हा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
सावदा. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सावदा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-तंबाखूचा साठा आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची होंडा अमेझ कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांना प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप कारमधून वाहून नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सावदा पोलिसांनी सापळा रचला. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१२ वाजता संशयित होंडा अमेझ कार अडवून तिची झडती घेण्यात आली.
कारची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी तातडीने हा संपूर्ण माल जप्त करत कारही ताब्यात घेतली.
मध्यप्रदेशातून माल; भुसावळ-वरणगावात विक्रीचा संशय
प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हा माल भुसावळ आणि वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणात कारचालकासह संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, प्रतिबंधित मालाच्या पुरवठ्यामागे नेमके कोण आहेत, माल कोणाकडून खरेदी करण्यात आला आणि तो कोणत्या व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तींना वितरित केला जाणार होता, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितेश बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय तडवी यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.
गुटखा-तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर सावदा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या साखळीमागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
