यावल तालुक्यात खळबळ; देशी कट्टा, जिवंत काडतूस व रिकामी पुंगळी पोलिसांकडून जप्त
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
यावल तालुक्यातील कोळन्हावी गावच्या सरपंचावर हवेत गोळीबार करून तरुणांमध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोप झाल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. बिअर बारमध्ये कथितपणे देशी दारूची विक्री होत असल्याच्या आरोपावरून तरुण आणि सरपंच विकास सोलंके यांच्यात झालेल्या वादानंतर डांभुर्णी येथे गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी सरपंच विकास सोलंके याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास सोलंके याचा गावाजवळ बिअर बारचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री डांभुर्णी येथील काही तरुण या बारमध्ये गेले होते. बारमध्ये कथितपणे देशी दारूची विक्री होत असल्याचा आरोप करत संबंधित तरुणांनी मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. याच कारणावरून तरुण आणि सोलंके यांच्यात जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येते.
वादानंतर संतप्त झालेल्या सोलंके याने तरुणांना घाबरविण्याच्या उद्देशाने डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
देशी कट्टा अन् काडतूस पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शुक्रवारी पहाटे संशयित विकास सोलंके याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाने भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले. प्राथमिक तपासात संबंधित कट्टा सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा अवैध कट्टा आरोपीपर्यंत नेमका कसा पोहोचला? तो कोणी विकला? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास यावल पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून शांतता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
बारमधील कथित दारूविक्रीच्या आरोपापासून सुरू झालेला वाद थेट हवेत गोळीबारापर्यंत पोहोचल्याने यावल तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
